लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

किस्से अण्णाभाऊंचे

क्रांतिसिंह नाना पाटील यांना मार्ग दाखविणारा पठ्या

रेठरे गावच्या जत्रेत क्रांतिसिंह नाना पाटलांचे भाषण संपले आणि अचानक येथे ब्रिटीश अधिकारी येऊन सभेतील लोकांना हाकलू लागले. नाना पाटलांना पकडण्यासाठी पोलिसांची एक फौजच त्यांच्या मागे पळू लागली. नाना पाटील जंगलातून, रानावनातून पळ काढू लागले. नाना पाटीलांनी मागे वळून पाहिले तर एक मुलगा त्यांचा पाठलाग करत होता. नाना पाटील यांनी थांबून त्या मुलाला विचारले, “का रे माझ्या पाठीमागे पळत का येत आहेस तू?” तो पाठलाग करणारा आठ- दहा वर्षाचा मुलगा मोठ्या चतुराईने क्रांतीसिंहांना म्हणाला, “ मी पाठलाग नाही करत, तुम्हाला रस्ता दावतोय.” त्या धाडसी बालकांचे नाव होते "अण्णाभाऊ साठे". पुढे याच अण्णाभाऊ साठे यांचे कार्य असंख्यांसाठी ‘मार्ग’दर्शक ठरले.’दर्शक ठरले.


नेहरूंनाही माझ्या घरात वाकून याव लागेल

वडील थकल्यामुळे वयाच्या १७-१८ व्या वर्षीच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली. नंतर ते माटुंग्यातील चिरागनगर येथे एका झोपडीत राहायला आले. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या लेखणीतून एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृती घडल्या. ते म्हणायचे, 'आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे'. अण्णाभाऊ साठे यांना लोकांनी एकदा विचारले, ''तुमच्या झोपडीचे दार एवढे लहान का?'' यावर अण्णाभाऊ म्हणाले, ''पंडित नेहरू जरी माझ्या झोपडीत आले तरी त्यांना वाकूनच यावे लागेल ! '' ! ''


सुजलेल्या हातातून घडले अजरामर साहित्य

गावाकडे आल्यावर अण्णाभाऊंना त्यांच्या मामाने शाळेत घातले. त्या वेळी त्यांचे वय थोडे जास्तच होते. मुळात तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळे अण्णाभाऊंना शिकवण्याची गुरुजींची इच्छा नव्हती. त्यामुळे शाळेत आलेल्या तुकारामवर संतापतच गुरुजी त्याला म्हणाले, “कालपासून ही चारच अक्षरे तू गिरवतो आहेस, तरी तुला ती नीट लिहिता येत नाही.” त्यावर अण्णांनी त्यांना आपण कालच शाळेत आलो असल्याचे आणि इथून पुढे मन लावून शिकणार असल्याचे सांगितले. पण तरीही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता “घोड्याएवढा झाला आहेस आणि अक्षर काढता येत नाही,” असे म्हणत मास्तरांनी अण्णांच्या उजव्या हातची बोटे सुजेपर्यंत त्यांना मारले. दुसऱ्या दिवशी अण्णांनी वर्गात येऊन गुरुजींच्या अंगावर मोठा धोंडा टाकला. त्यामुळे गुरुजी कोलमडले आणि विद्यार्थ्यांना सांगू लागले, “पकडा त्या तुक्यांला...” पण तोपर्यंत अण्णा घरी पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी गावातील पंचांकडे तक्रार केली. पंचांनी अण्णा आणि त्यांच्या वडिलांना बोलवून घेतले. बरोबर अण्णांचे मामा फकिरा हे देखील आले होते. पंचांनी अण्णांची सुजलेली बोटे पाहिली. ते म्हणाले, "गुरुजी, तुम्हाला मुलं आहेत की नाही ?, गरिबाच्या पोराला तुम्ही एवढे मारले. स्वत:च्या पोराला एवढे मारले असते का ?” अण्णांचे मामा म्हणाले, “जर तुम्ही गावातील दुसऱ्या कोणत्या पोराला एवढे मारले असते तर तुम्हाला गावातून पळून जावे लागले असते. गुरुजी, इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं म्हणून तुम्ही ठरवू नका. पोराला नीट शिकवा. नायतर इपरित व्हईल. गुरुजी गरिबांच्या मुलांना दूर लोटू नका. उद्या शिकून ह्याच तुक्यालचा तुकाराम होईल आणि तो विमानातून इंग्लंड, अमेरिकेला जाईल.” मामांच्या या बोलण्याने गुरुजी निरुत्तर झाले. भविष्यात मामांचे शब्द खरे ठरले. आपल्या कार्यकर्तुत्वामुळे अण्णाभाऊ साठे यांना रशियाकडून निमंत्रण आले. मास्तरांच्या अमानुष कृत्यातून अण्णाभाऊंची शाळा कायमची सुटली खरी पण त्या सुजलेल्या हातांनी अजरामर साहित्य घडविले.घडविले.


स्वछंदी कलाकाराची जडणघडण

लहानपणापासूनच अण्णांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. गर्दीपासून दूर असे डोंगर, दऱ्या, राने, नद्या या ठिकाणी भटकंती करण्याची त्यांना विशेष आवड होती. त्यातूनच पक्षी निरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पाना-फुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं काम होते. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्याभोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या स्वछंदी वृत्तीतूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या कलाकाराची खऱ्या अर्थाने जडणघडण झाली.


कामगारांमध्ये स्वाभिमान जागृत करणारे अण्णाभाऊ

शेतमजूर, कामगार आणि एकदंरच श्रमजीवी वर्गाने आपली जात, धर्म, वर्ण, लिंग विसरून अन्यायाविरुद्ध संघटित झाले पाहिजे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली. यास खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचा मानस अण्णाभाऊंनी बाळगला आणि पूर्णत्वासही नेला.ेला.

गरीब जनता, कामगार, शेतकरी आणि असंघटित वर्ग यांच्याविषयी अण्णाभाऊंच्या मनात अपार करुणा होती. संयुक्त महाराष्ट्र, स्वातंत्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामप्रमाणेच भांडवलशाहीविरुद्ध कामगार लढा उभा करण्यात असलेले अण्णाभाऊंचे भरीव योगदान आपण कदापि नाकारू शकत नाही.

यासंदर्भातील एक प्रसंग आवर्जून नमूद करावासा वाटतो. तत्कालीन भांडवलशाही शोषणास बळी ठरलेल्या धोंडा नावाच्या एका मजूराला त्यांचे वरिष्ठ कायमच ‘धोंड्या’ या नावाने संबोधत होते. धोंडाला हे खटकत असूनही केवळ वरिष्ठांच्या भितीपोटी त्याविरुद्ध बोलण्याचे त्यांचे धाडस होत नव्हते. याच दरम्यान ‘कामगार लोकशाहीर’ म्हणून अण्णाभाऊ लोकप्रिय होत होते. यावेळी अण्णाभाऊंच्या पोवाड्यातून अधोरेखित होणाऱ्या स्वाभिमानी विचारांकडे धोंडा आकर्षित झाले. "अंधारलेल्या जीवनात स्वत्वाची ओळख झालेले धोंडा एकदिवस आपल्या वरिष्ठास म्हणाले, माझे नाव धोंड्या नाही. धोंडा आहे, ते धोंडा असेच पुकारा." अण्णाभाऊंच्या विचारांनी कामगारांमध्ये केवळ सामाजिकच नव्हे तर वैचारिक प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित केली. ज्याच्या तेजाने पुढे असंख्य कामगारांचे आयुष्य प्रकाशमान केले..