लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णाभाऊ

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा हुंकार होता. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात विचारवंतांबरोबर कलाकारही सहभागी झाले होते. सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचे महत्वाचे कार्य शाहिरांच्या पोवाड्यांनी केले. ते या लढ्यातील बिनीचे शिलेदार होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कवने गाऊन शाहिरांनी सारा महाराष्ट्र दणाणून सोडला होता. या शाहिरांनी दिल्लीचे तख्तही हादरवले. यातीलच एक आघाडीच नाव होते ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे. मुंबई महाराष्ट्राला मिळावी, यासाठी डफावर थाप मारून ‘माझी मैना गावाकडं राहिली.. माझ्या जिवाची होतीया काहिली’ हे खुमासदार रूपक अण्णाभाऊंनी रचले. या गीतामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अण्णाभाऊंनी जनमानसापर्यंत पोहोचवला. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात मराठी बोलीचा अस्सल बाज जागवला.

या चळवळीची तीव्रता इतकी होती की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णाभाऊ साठे, अमर शेख व द. ना. गव्हाणकर यांच्या कलापथकावर तत्कालीन सरकारने बंदी घातली होती. अण्णाभाऊंच्या काव्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील कामगार-शेतकरी वर्गाच्या स्थितीचे भेदक विश्लेषण होते. त्यांचे लढे, त्यांची सुखदु:खे होती. ‘मुंबईचा गिरणी कामगार’, ‘तेलंगणचा शेतकरी’ वगैरे पोवाड्यांमध्ये ही दृष्टी अगदी उघड व स्पष्ट दिसून येते. म्हणूनच अण्णाभाऊ साठेंची गणना केवळ कवी, लेखक, कादंबरीकार, कथाकार, पोवाडेकार, नाटककार इतकी मर्यादित केल्यास त्यांच्या योगदानास अन्यायकारक ठरेल. एक क्रांतिकारक म्हणूनही त्यांचा वाटा अतुलनीय असाच म्हणावा लागेल.