लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

"जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि तीच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्रभूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहित असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य ह्रदयानं मिळवावे लागते. डोळ्यांनी सर्वच दिसते. परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देते. माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या, शोषितांच्या, कामगारांच्या तळहातावर तरली आहे. त्या शोषितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने नि निष्ठेने मी चित्रित करत आहे आणि करीत राहीन."

('वैजयंता' या कादंबरीच्या प्रस्तावनेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भूमिका )

या महान व द्रष्ट्या साहित्यिकाच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आजवर अनेक साहित्य संमेलने झाली आणि होत आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रयत्नातूनच ‘अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन’ भरू लागले. यामागील उद्देश सांगताना कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात, “ अण्णाभाऊंनी साहित्याच्या विविध क्षेत्रात विपुल आणि दर्जेदार लिखाण केले. असे दर्जेदार आणि विपुल साहित्य लिहून सुद्धा मराठी साहित्यामधील त्यांचे योगदान योग्य पद्धतीने लोकांच्या समोर आले नाही. त्यांचे कर्तुत्व, त्यांचा विचार,त्यांचा व्यवहार काही विशिष्ट वर्गामध्ये संकुचित होत होता. त्यांच्या कार्याची त्यांच्या विचाराची, त्यांच्या व्यवहाराची एक व्याप्ती समाजापुढे यावी, या उद्देशाने या साहित्य संमेलनाचा पायंडा पाडला आहे.”

कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन, कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन, राज्यस्तरीय अण्णाभाऊ साहित्य संमेलन, राज्यव्यापी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, राज्यव्यापी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, शाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, साहित्यरत्नी अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन, किंवा साहित्यिक अण्णाभाऊ साहित्य संमेलन या नावांनी ही संमेलने भरतात. आजवर यशस्वीपणे पार पडलेल्या अण्णाभाऊ साहित्य संमेलनांची यादी :

• १ले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे २००८मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. हे साहित्य संमेलन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या प्रयत्नांयतून झाले.

• पहिले राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.

• २रे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. राजन गवस होते.

• दुसरे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नाशिक येथे २३-२४ जुलै २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.

• ३रे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे.

• तिसरे राज्यव्यापी कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नांदेड येथे २०११ साली झाले. संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर होते.

• ४थे राज्यव्यापी कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नागपूर येथे २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट लेखक एकनाथ आव्हाड होते.

• ५वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते.

• ५वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठेसाहित्य संमेलन ४-५ जानेवारी २०१४ साली नाशिकमध्ये झाले. संमेलनाध्यक्ष रावसाहेब कसबे होते.

• ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे २०१० साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.

• ६वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे १७-१८ जानेवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी सतीश काळसेकर होते.

• कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठान पुरस्कृत आणि बार्शीतील प्रगतीशील लेखक संघ व आयटक कामगार केंद्र आयोजित ७वे कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन २५ व २६ डिसेंबर २०१५ रोजी बार्शीत झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे होते. ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले..

• ९वे साहित्यरत्नज अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते.

• कोल्हापूर येथे १०-११ ऑगस्ट २०१३ या दिवसांत एक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष गोविंद पानसरे होते.

• याशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने झाली होती.

• ८वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, बेळगाव, १६-१७ डिसेंबर २०१७, अध्यक्ष - डॉ. माया पंडित

• १०वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे राज्यव्यापी साहित्य संमेलन धुळे येथे १३-१४ जुलै २०१९ या काळात झाले, अध्यक्ष - विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात(विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष) हे होते.