लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

प्रगल्भ समाजसुधारक

रेठर्‍याच्या जत्रेत अण्णाभाऊंनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा खोलवर परिणाम अण्णा भाऊंच्या मनावर झाला यातूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा निश्चिय त्यांनी केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही अण्णाभाऊंनी जनजागृतीचे झोकून काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वाटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी, त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. अण्णाभाऊ जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले. तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते आर.बी. मोरे, के. एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्यासह ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते गाऊन दाखविणे अशाप्रकारे पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत त्यांनी 'लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली

इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले. याच काळात अण्णाभाऊंनी स्वतंत्रपणे लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांनी पहिले काव्य लेबर कॅम्पमधील ‘डासांवर’ लिहिले. त्यांचा ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ त्या वेळी कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. १९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. वैचारिक आणि कलाविषयक वाचनामुळे समृद्ध लेखक घडायला मदत झाली. अण्णाभाऊंना आंतरराष्ट्रीय प्रश्नांचीही जाणीव होती. युरोपमधील फासिस्टवादाचे आव्हान, साम्राज्यवादाचे बदलते स्वरूप आणि समाजवादाच्या प्रस्थापनेची गरज जाणून त्यांनी कवनं रचली. आंतरराष्ट्रीय प्रश्नाची एवढी समृद्ध जाणीव तत्कालीन मराठी लेखकांपैकी त्या काळात क्वचितच असावी. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा विविध वाड्.मयीन प्रकारांच्या माध्यमातून शोषण व्यवस्थांमधील आंतरिक उकल मांडणारे भारतातील ते कदाचित एकमेव साहित्यिक असतील.