लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे यांच्या कविता


1. गण

प्रथम मायभूच्या चरणा

छत्रपती शिवबा चरणा

स्मरोनि गातो । कवना ॥ धृ॥

स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क करुनिया गर्जना

लोक उठविला जागा केला त्या लोकमान्याांना

कठिण काळी राष्ट्रनौकांना

मार्ग दाखवीला तयांना

देशा दिली ज्यांनी प्रेरणा ॥ १ ॥

क्रांतिकारी वीरांना आणि त्यागी हुतात्म्यांना

देशासाठी देह झिजविला त्या नररत्नांना

महाराष्ट्र भूच्या भूषणा ।

पणा लावुनिया प्राणा ।

अर्पियले ज्यांनी जीवन ॥ २ ॥

आठवून मनी ही शुभनामे करुनिया स्तवना

आशिर्वाद मागतो आम्ही गावया कवना

सभापती आणि सुजना

कलावांत आणि रसिकांना

स्फूर्ती द्यावी हीच प्रार्थना

2. रवि आला लावुनी तुरा

रवि आला लावूनी तुरा । निघाली जिंदगी भरभरा ॥


दीप गगनाच्या डोईवर लागला । ढग तिमिराचा त्यानं निवारिला ।

झाले आकाश लाल । बघ उधळी गुलाल

रानारानात हर्ष पसरला । आला बहर गुलमोहरा ।

निघाली जिंदगी भरभरा ॥


रस रुपेरी वर्ष हा खालती । कृष्ण सोनेरी रांगात डोलती ।

बघ जागी झाली । धरा भाग्यशाली

नाचे देवाच्या दारी जणु मालती ।

उडे हरण जणू चौखुरा ।

निघाली जिंदगी भरभरा ॥


पानापानांत नाचे हा वारा ।

भूप रागाच्या छेडीत तारा ।

हासे कोकिळ मनी । मोर नाचे वनी ।

सप्तरांगाचा फुलवून पिसारा ।

जाहला हर्ष रानपाखरा ।

निघाली जिंदगी भरभरा ॥3. शिवारी चला

दौलतीच्या राजा उठून सर्जा

हाक दे शेजाऱ्याला रे शिवारी चला ॥

संदी लई नामी आलीया अवंदा

सावकारशाहीचा विखारी कुंदा

आरपार खुरपून पाडायचा रेंदा

दाखवाया बळा-उचल घे इळा

पोलादी पाजळून आपला रे शिवारी चला ॥

भांडवलशाहीचा चिवट केणा

वरवर छाटलाय तरी जाईना

अन जराशी बी शेती पिकू देईना

उपटून मुळी घाल पायदळी

तुडवून आला गेला रे शिवारी चला ॥

साम्राज्यशाहीची माकडं काळी

हातातला घास नित खाऊ न देती

ध्या दिसा लुटत्यात रां आंबराई

एकजूट करून नीट नेम धरून

आखरीचा माराया टोला रे शिवारी चला ॥

रातदीस राबून सालंना साल

किती पिढ्या आम्ही काढायचं हाल

रोवू आता बाांधावर बावटा लाल

काळावर चाल कर - हत्यार नीट धर

एकीचा बाांधुनी किल्ला रे शिवारी चला ॥

4. एकजुटीचा नेता

एकजुटीचा नेता। झाला कामगार तैय्यार

बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार ॥

सदा लढे मरणाशी ज्याला नच ठावे शांती

रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती

उठला खवळून झुंज झुंजण्याला

वादळ उठवून बांध फोडण्याला

निश्चय झाला पाय उचलला चालू लागला करण्या नवा प्रहार॥


मध्ययुगाची जीर्ण हाडे ही निरंकुश राजे

देशी धनवंतांचे साथी परकी साम्राज्ये

फाडुनिया बुरखा उघड जगा दावू

जागवून रंका समरांगणि जाऊ

आता अपुला, हा शेवटचा उगारलेला वार नाही चुकणार ॥

शेतकरी अन् दलित जनाला घेऊनिया पाठी

लोकशाही क्रांतीच्या अपुल्या एक ब्रीदासाठी

कोटी करी ज्याने ध्वजा लाल धरिली

मेघासम आता फळी धरून आपुली

पुढे चालला, रणी गर्जला, करुनी आपुला पोलादी निर्धार

एकजूट जनतेची साधुनी, जनराज्याची करून बाांधणी,

पूर्ण लोकशाहीला अणुनि, गाऊ मग यशगान

निनादून अस्मान, अंती वर्गाविहिन-हिंद करू निर्माण

बंध तोडले, पाऊल पाहिले, पुढे टाकले, मागे नच घेणार ॥

5. महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळुन काया

कंबर बांधून ऊठ घाव झेलाया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।

महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती ।

सुवर्ण धरा खालती । निल अंबर भरले वरती

गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी

तो अरबी सागर लागे जयाचे पाया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥

ही मायभूमी धीरांची । शासनकर्त्या वीरांची

घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आआणि दोरीची

संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची

स्मरून धुरंधर आता त्या शिवराया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥

पहा पर्व पातले आजचे। संयुक्त महाराष्ट्राचे

साकार स्वप्न करण्याचे। करी कंकण बांधून साचे

पर्वत उलथून यत्नाचे। सांधू या खंड की त्याचे

या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥

धर ध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची

पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची

घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची

उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ॥