लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ

कामगार, पद दलितांच्या आंतरिक वेदनांना, अव्यक्त भावनांना शब्दातून अभिप्रेत करण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी त्यावेळी केला. सामाजिक संघर्षाला केंद्रस्थानी ठेऊन अण्णाभाऊंनी साकारलेल्या लावण्या, पोवाडे, लोकनाट्ये या माध्यमातून त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी झाली. अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. तमाश्यांच्या पारंपारिक धाटणीत अमूलाग्र बदल घडवून आणत अण्णाभाऊंनी तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात केले. त्यांनी लोकनाट्यातून दलितांच्या वेदना संयमी व मवाळ भाषेत मांडल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवून आणले.

‘बंगालचा दुष्काळ’, ‘तेलंगण संग्राम’, ‘पंजाब-दिल्लीचा पोवाडा’, ‘अंमळनेरचे हुतात्मे’, ‘काळ्या बाजाराचा पोवाडा’, ‘माझी मैना’,‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा’, ‘बर्लिनचा पोवाडा’, चिनी क्रांतीवरील ‘चिनीजनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना इतकेच नव्हे तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या व्यतिरिक्त अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्या् चोर, बिलंदर बडवे यांसारख्या वगनाटयातून अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी केली. त्यातील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला ही कवन बरीच गाजली. अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड (लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्य क्षेत्रात प्रचंड गाजले. एकूणच त्यांच्या लिखाणात असलेल्या वस्तुनिष्ठ शैलीमुळे वाचकांना त्यांचे लेखन विशेष भावले. त्या वेळच्या राजकीय परिस्थितीबद्दल सामान्यांमध्ये जागृती घडवण्याचे महान काम या महापुरुषाच्या हातून घडले. आजही अण्णाभाऊंचे साहित्य हे अनेकांसाठी अखंड असा ऊर्जास्त्रोत आहे.