लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊंची लेखणी

“साहित्याला केवळ कल्पनेचे पंख असून चालत नाही, तर वास्तवाचे पायही असावे लागतात.”

कोणताच लेखक हा जन्मजात प्रतिभावंत नसतो. त्याच्यात उपजत असलेली संवेदनशीलता त्याला समाजाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. आणि त्याचे अंतर्मनावर उमटलेले पडसाद त्याच्या लिखाणातून प्रेरित होऊन असंख्य वाचक वर्गास अंतर्मुख होण्यास भाग पाडतात. अण्णाभाऊंचे अथांग साहित्यदेखील यापैकीच एक असे म्हणावे लागेल.

मुंबईत अण्णाभाऊंचा कामगार चळवळीशी संबंध आला, तेव्हा कामगारांचे धनिकांकडून होणारे शोषण त्यांना अस्वस्थ करून गेले. याला वाचा फोडली पाहिजे, या भावनेतून त्यांनी कवने, गाणी तसेच पोवाडे रचले. कामगारांमध्ये ते ‘कामगार शाहीर’ म्हणून लोकप्रिय झाले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी स्वतः ला झोकून दिले. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा गायला. त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ? या लोकनाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटयेही लोकांच्या पसंतीस उतरली.

अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्या कंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा यांसारख्या कथासंग्रहाला भरभरून प्रसिद्धी मिळाली. त्यांनी एकूण ३५ कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर फकिरा (१९५९), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता यांसारख्या कादंबऱ्यांना लोकप्रियता प्राप्त झाली. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण असलेल्या त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्काराने गौरविले. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर पुढे जाऊन काही चित्रपटही प्रदर्शित झाले. वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता), टिळा लावते मी रक्ताचा (आवडी) , डोंगरची मैना (माकडीचा माळ) , मुरली मल्हारीरायाची (चिखलातील कमळ) , वारणेचा वाघ (वारणेचा वाघ) , अशी ही साताऱ्याची तऱ्हा (अलगूज) , फकिरा (फकिरा) , याशिवाय इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान अशी नाटकेही अजरामर झाली.

महाराष्ट्रातील विद्यापीठात अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात तसेच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली. रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले. अण्णाभाऊंच्या साहित्यावरील अभ्यासकांच्या मते, “तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे वास्तववादी चित्रण हे अण्णाभाऊंच्या लिखाणाचे वेगळेपण म्हणता येईल. त्यांच्या साहित्यात कल्पना विलास, रंजकता अभावानेच आढळते. त्यामुळेच असंख्य वाचकांना, साहित्यप्रेमींना ते आकृष्ठ करते.” खरच..अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील योगदान अद्वितीय आणि असामान्य असेच म्हणावे लागेल. साहित्याची परंपरा नसतानाही अण्णाभाऊंच्या लेखणीतून उमटलेले लिखाण युगप्रवर्तक साहित्य म्हणून कायम स्मरणात राहील.