लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

आंबेडकरवादी अण्णाभाऊ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांमध्ये स्वाभिमान जागृत केला. व त्यांना ताठ मानेने जगण्याची जिद्द शिकविली. त्यांच्या मनात अन्यायाविरोधात बंड पुकारण्याची भावना निर्माण केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या जीवनमूल्यांसाठी ते अखेर पर्यंत लढत राहिले. अण्णाभाऊ साठे यांना बाबासाहेबांच्या याच विचाराने प्रेरित केले. त्यांच्या विचारांना अण्णा भाऊ साठेंनी आपल्या कथा- कादंबरी यामधून अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेबांना ते गुरुस्थानी मानत. डॉ. बाबासाहेब म्हणजे त्यांना एक स्फूर्तिदायक शक्ती वाटत होती. म्हणूनच त्यांनी ‘फकिरा’ ही तिसरी कादंबरी त्यांना अर्पण केली. ‘तक्षक’ या आंबडेकरी चळवळीचे मुखपत्र असणाऱ्या नियतकालिकातून अण्णाभाऊंच्या काव्यरचनांना प्रसिद्धी प्राप्त होत असे. बाबासाहेबांवर गीतलेखन करणारे अण्णाभाऊ हे पहिले साम्यवादी कवी होते. ‘जग बदल घालुनि घाव सांगून गेले मज भीमराव’ हे अजरामर क्रांतीगीत ही त्यांनी बाबासाहेबांवर लिहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साम्यवादी चळवळीपासून दूर ठेवण्याच्या प्रतिकूल काळात अण्णाभाऊंनी हे गीतलेखन करण्याचे धारिष्ठ दाखविले.

न्याय, समता, स्वतंत्रता आणि बंधुता ही बाबासाहेबांची विचारधारा होती. ‘माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे.’ समाजातील लिंग, जाती, वर्ण यासारखे भेद समूळ नष्ट व्हावेत, यासाठी डॉ. बाबसाहेब आंबेडकर आयुष्यभर झटले. हीच जाणीव अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडली. यावर आधारित त्यांनी आपली सामाजिक आंदोलनाची रूपरेषा निर्माण केली. वास्तववादी समाजाचे चित्रण करताना माणसाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी तसेच समाज परिवर्तन घडविण्यासाठी त्यांनी साहित्य हे प्रभावी माध्यम निवडले. प्रगत समाज घडवायचा असेल तर अंधश्रद्धेस मूठमाती दिली पाहिजे, हा डॉ. बाबासाहेबांचा विचार अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून अधोरेखित केला. तत्कालीन समाजाचे वैचारिक प्रबोधन करताना प्रवाहाविरोधात जाऊन अण्णाभाऊंनी “ पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कामगारांच्या तळहातावर तरली आहे.” हा वास्तववादी विचार मांडला. हे माध्यम प्रस्थापित तत्कालीन साहित्यिक प्रयोजनापेक्षा निश्चितच वेगळे होते. यावर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता.