लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे: एक अलौकिक व्यक्तिमत्व

“टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही...” या म्हणीची तंतोतत प्रचिती यावी, असा संघर्षमय प्रवास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला आला. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० साली सांगली येथील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहानश्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ साठे तर आईचे नाव वालूबाई होते. अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम साठे पण पुढे आपल्या सार्वजनिक कार्यामुळे ते समस्त समाजाचे ‘अण्णा’ झाले. अण्णाभाऊंचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीतून गेले. तत्कालीन जातीय उतरंडीची झळ बसल्याने शिक्षणाची आस असूनही त्यांना तांत्रिकदृष्ट्या शिक्षण प्राप्त होऊ शकले नाही. परंतु, त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली ते आपल्या वडिलांसोबत मुंबईला आले. चरितार्थासाठी त्यांनी कोळसे वेचले. मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी केली. असे पडेल ते काम करत अण्णाभाऊंचे बालपण सरले. मुंबईत वास्तव्यास असताना कामगारांचे कष्टमय जीवन त्यांनी जवळून अनुभवले. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद जडला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले.

चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. परंतु, वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अण्णाभाऊंच्या अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. रेठरे येथील जत्रेत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणाने अण्णाभाऊ साठे यांच्यात स्वातंत्र्याचे स्फुलिंग पेटले. पुढे १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या वक्तृत्वाने प्रभावित होऊन ते कम्युनिस्ट पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते झाले. पुढे १९४२ च्या स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला असताना ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले. ब्रिटिशांना शरण न जाता अण्णाभाऊंनी थेट मुंबई गाठली. इथेच त्यांच्या जीवनास खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव ‘लोकशाहीर’ म्हणून गाजू लागले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा नावलौकिक वाढू लागला. परंतु, असे असले तरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून देखील ते सदैव कार्यरत राहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन अशा सर्वच प्रकारातून जनजागृती केली. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची चळवळ सामान्य कष्टकरी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा वापर केला. या माध्यमातून राजकीय, सामाजिक प्रश्नांविषयी त्यांनी प्रबोधन केले. असा साहित्य क्षितिजावर तळपणारा तेजस्वी तारा, निधडय़ा छातीचे साहित्यिक आपली सर्व साहित्यसंपदा जगभरास अर्पण करून १८ जुलै १९६९ रोजी अनंतात विलीन झाले. वादळी सागरामध्ये नौकेला जसा दीपस्तंभाचा आधार असतो, त्या दीपस्तंभाप्रमाणे समाजातील असंख्य घटकांसाठी त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व आधारस्तंभ बनून राहील हे नक्की.